Wednesday, July 22, 2009

इन लम्हों के दामन में

तू म्हणत्येस ते खरंय कान्हू,

शेवटी प्रश्न हा ज्याचा त्याचाच असतो. आपण मारे अंगणात अस्वस्थतेच्या फे‍र्‍या घातल्या तरी कळांचे भार सोसवून लखलखत्या वेदनेचं पातं काळजावरुन फिरवणं, त्याला ’मी’ म्हणणं आणि यासारख्या अंताला दुसरी ’सोय’ नाही.

अर्धी रात्र जाळून काढल्यानंतर तुझ्यात ती जीवघेणी हाक नाही म्हणता म्हणता हृदयात पळस फुलवल्यासारखा एका वाक्यापुरता लेखक जगतो ब‍र्याचदा. आपलेच मोहोर दुसर्‍याच्या मनात ठिणग्या उभ्या करतात तेव्हाच तो उशाला झंझावात उजवून स्वत: शांत झोपतो.

मी ही थांबायचं ठरवलं होतं.....प्रवाहात आपल्याच वितळलेल्या तुकडयांचा मागोवा घेत. पण कोसळताना माणूस काहीही शिल्लक ठेवत नाही, झाडावरुन गळणारी फुलं जसे झाडांचेच संदर्भ घेउन कोसळतात तशी. कोसळल्यानंतर ’माणूसपण’ जागं होतं की माणूसपणाची जाग येते तेव्हा ’तो’च झंझावात सहन होत नाही आणि तो कोसळतो......

मजेपुरती, झिंगण्यापुरती ढोसायची असं ठरवून प्यायची आणि सकाळी उठून त्याचा कडवटपणा घालवण्यासाठी भकास प्रयत्न करायचे.........जात नाही, जात नाही पण तो....रक्तात बुडलेला असतो.
आपल्याला झेपवेल, पेलवेल असा उघड अट्टाहास करुन संन्याशासारखं फिरता येतं, संन्यासी होता येत नाही. आपले भास तेवढयाच ताकदीच्या दुसर्‍या कुणी उलगडून दाखवले की तेवढं, प्रामाणिकपणे हो म्हणण्यापुरतंही साहस निघून गेलेलं असतं.......तेच खरं संन्यासी झालेलं असतं.

बरंच चालून मागे वळून पाहिलं....डोळे भरुन आले.,आपण पडलो आणि धैर्याने उठलो या आनंदाचे असावेत अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण समाधान उराशी नाही. आपल्या सोबत चालणा-याची म्हणावी तशी साथ देउ शकलो नाही कळल्यावर उगीच कळवळलेल्या दु:खाची कढ होती ती.

माझ्या पत्रांमध्ये खरं-खोटं याला मुळी थाराच देता येणार नाही मला.....उगा वेदना चेहर्‍यावर कष्टाने आणण्याचे हे प्रयत्नही नसावेत. मात्र माझं माझ्याच सानिध्यात असणं धोकादायक होतं......माझ्याचसाठी
अशावेळी तुझी सगळी पत्रं बोलकी होतात.....आणि आश्वासन नव्हे तर नवीन बळ देतात, राजहंसाच्या पंखात असावं अगदी तसंच...................

4 comments:

mugdha said...

bhannat lihites...
agdi manala bhidnaara..
-mugdha

सखी said...

थॅंक्स :)

कोहम said...
This comment has been removed by a blog administrator.
Simply Useful !! said...

Khupach sahi !!!

Pan kahi kahi kalat nahi aahe !!!