Wednesday, August 26, 2009

मंथन

अझिझ,

लेका बर्‍याच काळानंतर एक पुस्तक मस्तपैकी मागे लागलंय., म्हणजे भावनिक पसारा तसा आटोपशीरच पण बुद्धीतत्त्वावर लढणा-या आपल्यासारख्यांची हौस भागवणारं.

तुला आठवत असेल तर असं एखादं पुस्तकंच नव्हे तर वाक्य, शब्द किंवा अगदी कोणता-कोणताही आनंद उकळत्या उत्साहानिशी सांगण्यासाठी ’दाजीsssssssss’ म्हणून ओरडत पाठीला पाय लावून पळायचो आपण.

आपण साले आर्किमिडीज असतो तर दाजी, दाजी म्हणूनच ओरडत आलो असतो ना रे? किंबहुना मला वाटतंय की आर्किमिडीजचा आजा दाजींसारखा असता ना तर त्यालाही युरेका ची भानगड सुचलीच नसती.

पुस्तकं वाचणारे बहुत आहेत दोस्ता, पण दाजींसारखा पुस्तक खुलवून सांगणारा कुणी नाही. दाजी म्हणजे चालतं बोलतं पुस्तक होते, जगातल्या कोणत्याही पुस्तकाचा सारांश स्वत:च्या शब्दात खुलवणारे.

'I miss him badly.'

शांता गोखलेंच्या ’त्या वर्षी’ बद्दल म्हणत होते मी. शेवटची ओळ वाचून संपल्यावर हे पुस्तक आवडण्याचं एक कारण....लेखिकेने तटस्थपणे समोर मांडलेली पात्रं.

गडया, रंगमंच उभा करणं सोप्पंय पण त्यातल्या पात्रांना हवा तसा तो वापरु देणं हे कठीण! आपली कलाकृती मांडताना त्यात फक्त संकल्पना ओतत नाही मी, माझ्या संवेदनाही नकळत उमटत जातात.

अखंड शिल्प तयार झाल्यावर कुठे कुठे कोरीव जागी उरतो आपण मागे...स्पर्शातून कधी नेणिवांतूनही.

इथे मात्र एक संपूर्ण कॅनव्हास कुंचल्याचा, हव्या तशा रेघोटया मारण्याचं स्वातंत्र्य....आकाश आणि अवकाश प्रत्येकात खोल खोल बुडी मारण्याचं अवधान.

असं स्वातंत्र्य मला देता येईल का? माझीच सावली पूर्णपणे शरीरावेगळी करुन पाहंयाचे प्रयत्न चूक की बरोबर? लेखिकेने ते केलंय हे वाटणंही माझ्याच बुद्धीनुसार....पण ’ दाजींचं पुस्तक सांगतं, ’आपला आपल्याशीच झगडा असावा, तो संपेपर्यंत काहीतरी वेगळं गवसलेलं असतं...त्यालाच मंथन म्हणतात गुंडया.’

पुस्तकात काही संदर्भानुसार येणा-या छोटया गोष्टी....तिथे काहीवेळ थांबून आपलं निरांजन आपणच घासून पुसून लख्ख करावंसं वाटलं मला.

त्यातलीच एका’काशुओ इशिगुरो’ नावाच्या जपानी लेखकाची गोष्ट,

’त्यातला ओनो हा चित्रकार. तो आणि इतर शिष्य़ गुरुकुलात राहतात. सर्वच जण गुरुंच्या विचारांवर श्रद्धा ठेवून चित्र काढत असतात पण ओनो मात्र अस्वस्थ मनातून. गुरुंचं चित्रविश्व अति-रोमॅंटिक.

सुंदर गेशा, साके पिउन रंगलेल्या रात्री, पण ओनोला आजूबाजूचं वास्तव अस्वस्थ करत असतं. त्याची नवी चित्र पाहून गुरु नाराज होतात; पण हसण्यावारी नेतात. ही तरुणपणाची खुमखुमी आहे म्हणतात.’ही रग जिरेल आपोआप तोपर्यंत रंगव असली चित्रं.’

ओनो म्हणतो हा माझा विचार आहे, चित्रकाराने सदैव सौंदर्यात रममाण होणं मला योग्य वाटत नाही. आपला काळ कठीण आहे. कलाकारांनी आपल्या कामात भोवतालच्या परिस्थितीला महत्त्व दिलं पाहिजे. गुरुंचा भडका उडतो. ते त्याला ’चालता हो’ सांगतात. ज्या दालनात त्यांचं हे संभाषण चालू असतं ते हळूहळू अंधारायला लागतं. ओनो शांतपणे एकेक कंदील पेटवू लागतो. हे त्याचं गुरुकुलात रोजचंच काम असतं, तेवढं करतो आणि निघून जातो.’

आपल्या प्रत्येकात एक ओनो लपलेला नसतो? फळ्यावरचं चित्र बघून पावसातली बाई काढताना? सगळे सिद्धांत मान डोलवून वहीत छापताना? ’हे बरोबर नाही, कारण हे असंच आहे पूर्वीपासून’ अशी निरगाठ अधिकाधिक पक्की करताना.?

मनातले गोंगाट बाहेर न दाखवता हाच ओनो शांतपणे आपल्याच पेशींना कधी परका होतो याचा विचार करतो आपण? सृजनशीलतेला नियम असतात?

एका ’पेंटींग कॉम्पिटिशन मध्ये’ काढलेलं चित्र पाहता पाहता परीक्षक गंभीर होतात., सगळया चित्रांचे कागद चार वेळा तपासून बघताना त्यांना तेच काळ्या रेघोट्या मारुन विद्रूप केलेलं चित्र परत परत अस्वस्थ करतं. त्याहूनही अस्वस्थ करतं ते वास्तव...बारा वर्षाच्या मुलाच्या हातून असं काहीतरी का उमटावं?.......त्या मुलाला बोलवून ते प्रेमाने त्याची चौकशी करतात.

चित्रातली प्रतिमा त्याची आई....पण दुसरी. तिच्या वास्तवातल्या वागण्या-बोलण्यातून त्याच्या मनातल्या आईच्या प्रतिमांवर असेच ओरखडे उमटत जातात. ऐकून परीक्षकांकडे सांत्वनापुरते शब्दच उरत नाहीत.

मुलाच्या चित्राला पहिलं बक्षिस मिळतं. मुलगा मात्र मान खाली घालून उभा असतो कोरडा....रखरखीत. चित्रातल्या काळ्या रंगासारखा ठळक.

आपण सौंदर्यच पाहिलं मग ते रेखाटू नये असं नाही रे पण कुणाच्या चित्रातल्या दाहक प्रतिमा फोल ठरवणारे आपण कोण?

*************

पुस्तकात रेंगाळावंसं वाटणारी ही दुसरी जागा....काही मान्यवर चित्रकारांपैकी एकाच्या भाषणातून येते.
सत्य आहे, आजच्या बर्‍याच कलाकारांची कैफियत आहे.

’ऐंशीच्या दशकात आमच्यासारखे चित्रकार जे कलाविश्वात उतरले त्यांच्या आणि आजच्या परिस्थितीत काही साम्यस्थळे आहेत. आमच्या चित्रांना तेव्हा जशी मागणी नव्हतीच तशीच आजच्या इन्स्टॉलेशन्स, व्हिडीओ कलाप्रकारांना नाही.

’प्रोग्रेसिव्ह ग्रूप’ ने करुन करुन दिलेल्या वाटांचा आम्हाला किती फायदा झाला याचं वर्णन करुन सांगणं कठीण आहे. मी बंगालमधला. तिथं एका बाजूला अबनींद्रनाथ टागोर आणि दुसर्‍या बाजूला जामिनी राय्हे तथाकथित अस्सअल भारतीय कलेचे प्रतिनिधी. त्यांच्य कामात आम्ही आम्हाला सापडत नव्हतो. तो काळ नवतेचा. भाकरा नांगल धरण उठत होतं. ’ल कॉर्ब्युझीए’ चंदीगढ बांधत होता. बिमल रॉयने ’दो बिघा जमीन’ हा समाजाची काळी बाजू दाखवणारा चित्रपट तयार केला होता. त्याही आधी उदयशंकरनं ’कल्पना’ चित्रपटाची निर्मिती करुन नृत्यकलेला उच्चअस्थान प्राप्त करुन दिलं होतं.

आम्ही कोणीही परंपरा नाकारली नाही. तिला तात्पुरती दृष्टीआड केली. काही निर्माण करायचं झालं की काहीतरी तोडावं लागतं. हे सर्व सृजनात्मक कार्याचं तत्त्व आहे. अशा काळात कलाकार स्वत:ला पूर्णपणे ताणत असतो. दृष्टिक्षेपातलं शेवटचं टोक गाठत असतो. ते गाठल्यानंतरच ह्या देशात वाढलेल्या, रुजलेल्या आणि अंत पावलेल्या चित्रपरंपरा आणि वर्तमानातले प्रवाह यात कुठे तरी तो आपला सर्जनशील बिंदू शोधण्यात सक्षम होतो....

त्या वेळच्या समाज अभिरुचीला केवळ वास्तववाद मान्य होता. मध्यमवर्गीयांना जी चित्र पटकन कळली, भावली अश साध्या सोप्या गोष्टी सांगणा-या देखावे रंगवणा-या चित्रांनी ही अभिरुची घडवली होती. तिची कास सोडायला हा वर्ग तयात नव्हता. त्यामुळे आमच्या प्रयत्नाला तिरस्काराखेरीज या समाजाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

आज एका दिवंगत कलाकाराचं चित्र १५ लाख रुपये किमतीला विकलं गेल्याची बातमी आपण अभिमानाने सांगतो, तेव्हा हे ध्यानात ठेवलं पाहिजे की त्याचं १लं चित्र विकलं गेलं ते ३२व्या वर्षी २०० रुं. ना., ते ही पाश्चिमात्त्य संग्राहकाला. तो आप्ला माणूस होता, आपल्या मातीत जन्मलेला. म्हणून आज आपण गर्व करतो पं त्याच्या हयातीत त्याच्या कलेला आपण परकी कला ठरवलं होतं हे विसरुन चालणार नाही......’

आपण जिवंत असताना संस्कृती गतप्राण होतेय म्हणून बोंबलू कसे शकतो आपण?

मोठाच्या मोठा उतार झालाय आपापलीच तत्त्वं झापडं लावून फरफटत नेण्याच्या प्रयोगात....पायथ्याशी संस्कृतीचे रक्षणकर्ते.....टोकावरच्या लोकांशी त्यांचा संपर्कच तुटलेला. मधले पूल गायब. अशी टिकेल संस्कृती की संस्कार?

असले प्रश्न विचारुन भंडावून सोडलं तरी पक्क्या विचारांच्या बैठकीनिशी माझं मलाच उत्तर शोधायला लावणारे दाजी....त्यांना कुठे रुढीप्रिय राहण्याची सवय होती? पण रुढीप्रिय नाही म्हणून आपल्या पाळामुळांविषयी आपल्याला ठाउक असणंच महत्त्वाचं नाही या मताचे मात्र नक्कीच नव्हते.

आपला विश्वास आहे की नाही हा अध्याय पुढचा पण उद्या भांडायचं झालंच तर ज्ञान मात्र हवं अगदी पुढच्या मागच्या दोन्ही खंडांचं. पाया डळमळीत बांधून मजले रचण्याचं तंत्रज्ञान फुकाचं, त्यात कसब नाही. मग पत्त्त्यांसारखे कोसळले की लढवणार आपण नवशिके मावळे.

पुस्तकांचं एक आवडतं...नवनव्या पटांवर अशी चेकमेट करण्याची, होण्याची मजा असते. आपापल्या ताकदीनिशी आपण तानाजी लढवायचा.... फक्त इथे सरशीपेक्षा, लढत महत्त्वाची.

************
दाजींच्या एका नाटयप्रयोगातलं माझं एक ज्याम फेवरेट वाक्य आठवतंय आत्ता. त्याचे तपशील तूच शोध.

श्रीमंत, लेकीची खेळण्याची हौस संपलीये.....
आपणच उभारलेल्या रंगमंचावर थोडं कसदार होउन वावरु दे तिला....सम्राज्ञीपण पेलवताही यायला हवं..जोपर्यंत त्याची मिरवणूक निघत नाही तोपर्यंत पडदा टाकण्याची गरज नाही.

Monday, August 10, 2009

भिंगरी

’शिर्‍या, धांदरटा...नादिष्ट पोर कुठला...आलास का छळायला, उठसूठ पोरीला नादवू नको...’
नानीचा धाक, थोडीशी भिती..बराचसा बेदरकारपणा. तरी तू आणि मी वा-याच्या पोरासारखे आळीतनं पसार.
कोवळ्या नाजूक हिरव्या रसरशीत चिंचा..... वर वर अगदी झुल्याच्याही टोकावर.

’शिर्‍या काढून दे ना..... सुट्टीत माझ्या डब्यातली घावनं तुझी.’

’नकटे...ती अशीही मीच खाणार...तू उपास कर काकूसारखे..कित्ती फुगलीयेस.’


’बारीक पेराचा, गोबर्‍या गालाचा आणि हनुवटीला उभा छेद देणा-या जिवणीचा...शिर्‍या माझा दोस्त आहे गं नानी.’
नानी फुरगट....नुसती तिची वटवट. तिला कोण जुमानील.
नानीबरोबर लोकं पण वेडी....’शिर्‍या आणि सुमाचं लग्न करुन टाका. जोडी छान दिसते.’
भलतंच काहीतरी शिर्‍या रे...लोकांच्या पोरी उजवायच्या कशा, गावभर चुली पेटवायच्या कशा...लोकांना एवढंच काम.

सगळी वेडी लोकं भलतीच शहाणी झाली....ऊसावर ऊस काढतात, सगळ्या पोरींना राबवतात. म्हणजे पोरी फिरणार नाहीत, आई-बापाचं नाव मातीत मिसळणार नाहीत. वेडेच वेडे....सगळेच वेडे.

दोस्ता आपण फरफटलो, चौकटीत फिरवलेल्या गोटीसारखे....एकानं इकडून हलवावं..दुसर्‍याने दुसरीकडून....दोघांचेही अंदाज वांझोटे निघाले तर आपण आपले वेशीवर...ना दरीत ना हिरवळीवर.

*********

’एवढंसं बोललं म्हणून रडतात का कोणी, गाढव कुठली...’

’दादा, मला येतं रडू...रडलं की बरं वाटतं.’

’तिचं काय चुकलं....ताईच्या जाण्याचा मीच धसका घेतला फार आणि मागाहून ही झाली म्हणून तिला फुलासारखं जपत गेले...आता वाटतं तेच करायला नको होतं... सोडून द्यायला हवी होती, म्हणजे श्रीकांतसारखी झाली असती. माझंच चुकलं...

आता माईला तिची चूक कळेपर्यंत मी मोठी झालेही ही काय माझी चूक?

सुमा स्वयपाक बघ...पाणी बघ...रांगोळी शीक, आणि अभ्यासही नीट कर....नोकरी करशील तर घरही सांभाळ....सासर जपून ठेव. मी काय आदर्शवादी बुजगावणं आहे, वाईट भुतं पळवून लावायला.
मला आवडते की आपली गावदेवी....तिच्या डोळ्याला गिरिजा घाबरते. मला तेच डोळे आवडतात. नजरेत कशी धाक आहे तिच्या तेवढीच माया सुद्धा. देवी असावी तर अशी. आणि स्त्री असावी तर मामींसारखी.
विचार कसे आखीव, रेखीव....मनाला पटेल ते ऐकणारे..तस्संच वागणारे. मामीच्याच काय तिच्या नवर्‍यामागेही हीच वेडी लोकं बोलतात..पण त्यांना मामी जुमानीत नाही ना तिचा नवरा.

***********

’बस ना मागे, आजच नवीन आणलीये.....’

’नक्को...भिती वाटते..’

’मी काही गटारात नेउन घालणार नाहीये...आणि पडलीस तर पडलीस..जरा खरचटू दे, बरंच होईल.’
’नाही मी काही घाबरत बिबरत नाही मागे बसायला पण नकोच. नानीला कळलं तर जपमाळेत देवाऐवेजी माझ्याच नावाचा उद्धार करील. राहू दे.’

पूर येउ देत पूर....पळून जातील माणसं...आपण सुद्धा पळून जाउ. म्हणतील मागच्या मागे गेली एकमेकांबरोबर पळून...बरंच आहे.

*******
शिर्‍या तू गावात ये, आपली शाळा बंद करायला निघालेत ही वेडी लोकं.. मुलींची फार संख्या नाही म्हणे...चोर कुठले. यांनीच बसवल्या घरी मुली. मी शहरातून आले की बघून घेईन एकेकाला.
लग्न करीन तर प्रशासकीय अधिका-याशीच असं ठणकावून सांगितलंय नानीला. तिची खात्री पटली....मी स्वार्थ पहायला शिकले म्हणून. तशाच समजुतीत राहो. मला नवर्‍याचा अधिकार हवाय...सगळ्यांना बघून घ्यायला एकजात.
पैसे काय एकडूनही खुळखुळ नी तिकडूनही. नानीला देउन टाकीन नोटा....बस म्हणावं मोजीत.

मी गेम करणार शि-या....शूटमधला नाही..खराखुरा. यांचा डाव खडी लावून मोडणार.

Wednesday, July 22, 2009

इन लम्हों के दामन में

तू म्हणत्येस ते खरंय कान्हू,

शेवटी प्रश्न हा ज्याचा त्याचाच असतो. आपण मारे अंगणात अस्वस्थतेच्या फे‍र्‍या घातल्या तरी कळांचे भार सोसवून लखलखत्या वेदनेचं पातं काळजावरुन फिरवणं, त्याला ’मी’ म्हणणं आणि यासारख्या अंताला दुसरी ’सोय’ नाही.

अर्धी रात्र जाळून काढल्यानंतर तुझ्यात ती जीवघेणी हाक नाही म्हणता म्हणता हृदयात पळस फुलवल्यासारखा एका वाक्यापुरता लेखक जगतो ब‍र्याचदा. आपलेच मोहोर दुसर्‍याच्या मनात ठिणग्या उभ्या करतात तेव्हाच तो उशाला झंझावात उजवून स्वत: शांत झोपतो.

मी ही थांबायचं ठरवलं होतं.....प्रवाहात आपल्याच वितळलेल्या तुकडयांचा मागोवा घेत. पण कोसळताना माणूस काहीही शिल्लक ठेवत नाही, झाडावरुन गळणारी फुलं जसे झाडांचेच संदर्भ घेउन कोसळतात तशी. कोसळल्यानंतर ’माणूसपण’ जागं होतं की माणूसपणाची जाग येते तेव्हा ’तो’च झंझावात सहन होत नाही आणि तो कोसळतो......

मजेपुरती, झिंगण्यापुरती ढोसायची असं ठरवून प्यायची आणि सकाळी उठून त्याचा कडवटपणा घालवण्यासाठी भकास प्रयत्न करायचे.........जात नाही, जात नाही पण तो....रक्तात बुडलेला असतो.
आपल्याला झेपवेल, पेलवेल असा उघड अट्टाहास करुन संन्याशासारखं फिरता येतं, संन्यासी होता येत नाही. आपले भास तेवढयाच ताकदीच्या दुसर्‍या कुणी उलगडून दाखवले की तेवढं, प्रामाणिकपणे हो म्हणण्यापुरतंही साहस निघून गेलेलं असतं.......तेच खरं संन्यासी झालेलं असतं.

बरंच चालून मागे वळून पाहिलं....डोळे भरुन आले.,आपण पडलो आणि धैर्याने उठलो या आनंदाचे असावेत अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण समाधान उराशी नाही. आपल्या सोबत चालणा-याची म्हणावी तशी साथ देउ शकलो नाही कळल्यावर उगीच कळवळलेल्या दु:खाची कढ होती ती.

माझ्या पत्रांमध्ये खरं-खोटं याला मुळी थाराच देता येणार नाही मला.....उगा वेदना चेहर्‍यावर कष्टाने आणण्याचे हे प्रयत्नही नसावेत. मात्र माझं माझ्याच सानिध्यात असणं धोकादायक होतं......माझ्याचसाठी
अशावेळी तुझी सगळी पत्रं बोलकी होतात.....आणि आश्वासन नव्हे तर नवीन बळ देतात, राजहंसाच्या पंखात असावं अगदी तसंच...................

Tuesday, June 2, 2009

कळावे लोभ असावा.

काही क्षणांचं क्रेडिट कोणाच्या नावावर द्यावं असा प्रश्नच पडतो मला नेहमी तावडे साहेब. कसं कधी कोण इटुकला-पिटुकला आनंद पदरात टाकून जाईल सांगता येत नाही. त्यातून माणसात रमणा-या मला त्याचं कवतिक जास्तच! सुख-दु:खाचा धांडोळा करण्यापेक्षा माणसाच्या थेट डोक्यात जाउन चर्चा करणं आवडतं आपल्याला. मनाचं सोडा, त्याचं काय घेउन बसलात.......माणसं डोक्याकडून मनापर्यंत जाणारी असावीत तिथून बाहेर जाण्याचा मार्ग नसतो. पण हे चक्रव्यूह बाकी उत्तम!!!

तुमच्यातलं एक धमाल ’व्यक्तिमत्त्व’ भेटलं नसतं तर लोणावळ्यापर्यंतचा प्रवास सार्थकी लागला नसता. त्यामुळे आपल्या बोलघेवडया नक्षत्रांमध्ये तुमची वर्णी लागली नाही तरच नवल!

पण आभाराचे पहिले धनी ’सोशो-टेक्नॉलॉजी’ची यशस्वी सेवा पुरवणारे, खिशाला भोकं पाडणारे ’व्हॉल्वो सर्विसवाले.’ त्यांच्या बसने अंमळ पाउण तास उशिर केला नसता तर आपली भेट झालीच नसती.

आणि स्नॅकेटेरियामधलं एकमेव जोडपं सोडलं तर पूर्ण बस-स्टॅंडवर एकही गोष्ट ईंटरेस्टींग नव्हती.....

खरं तर बस-स्टॅंड, रेल्वे स्टेशन्स म्हणजे ’हॅपनिंग जागा’. सुखेनैव गोष्टी बघण्याची, एका प्रबंधाला पुरेल इतकं खाद्य पुरवणारी जागा. त्यात व्हॉल्वो ने जाणार सांगितल्यावर गौर उडालीच होती.....तिच्या मते या बशीत हॅंडसम, मोस्ट एलिजीबल बॅचलर्स असतात....टीसीएस, विप्रो अशी नोकरीतली सुखावणारी लेबलंही त्यांना असतात. ’मोस्ट एक्साइटिंग थिंग फॉर गर्ल्स यू नो’............
ह्या निता’झ च्या स्टॅंडवर एक चिडचिडं रिकामलेपण साचलं होतं. त्यात भर म्हणून उन्हाच्या झळा.

स्नॅकेटेरियामध्ये एक पिज्झा पोटात ढकलून वर पाणी प्यायले....अगदी पोटात जाईपर्यंत त्याचा गार प्रवाह अनुभवला. हात धुण्यासाठी केलेल्या इकॉनॉमिक आयडियेचं पोटभरुन कौतुक केलं आणि मग मात्र बाहेर आल्यावर भूमिगत शांततेचं काय करावं असा प्रश्न पडला. बहुधा लोणावळ्याच्या स्टॉल्सवर दिसणा-य चिक्क्यांनी, रंगीबेरंगी सरबतांनी माझं मनोरंजन केलंही.....पण छोटया कंटाळ्याचं रुपांतर गहन फिलॉसॉफीत करण्यात अस्मादिक माहिर..........त्यामुळे त्यातून बाहेर काढणा-या क्लृप्त्या महाग असतात.

बुक-स्टॉल्सवर बर्‍यापैकी वेळ गेला...त्यात Randy Pausch च्या ’The last lecture' ची कॉपी दिसली. ती घेण्याच्या विचारात असतानाच.....तुमची ओळख झाली. देवगढ हापूसच्या माध्यमातून. जिव्हाळ्याची माणसं तेवढयाच जिव्हाळ्याच्या माध्यमातून भेटावीत असं नशीबच आहे बहुतेक.
खरं तर तुम्हाला पाहिल्यावर मला एक गंमत पाहून हसू आलं...........तुमच्या खांद्यावरच्या ’टॅलेन्ट हाउसवर’; दहा-बारा भुरभरणारे केस कातडीला एवलासाही रंग लागू न देता इतक्या कुशल पद्धतीने काळे करणा-याचं कौतुक आणि मनोमन गंमत वाटली.

तुमच्या काजू-फॅक्टरीची गाडी सुटली ती अगदी सगळे उद्योग सांगून मगंच थांबली. या वयात...हा माणूस एवढे उद्योग करतो, ते ही घर एका टोकाला......लग्नं झालेल्या दोन्ही मुली दुसर्‍या टोकाला अजून एखादा असलाच उद्योग तिस‍र्या टोकाला. तुमच्या जगावेगळ्या उत्साहाची तर दाद देनी पडेगी. ज्या वयात लोकं वानप्रस्थाश्रमाच्या गोष्टी करतात, त्या वयात तुमची सेकंड इनिंग सुरु. तुम्ही गावच्या माणसांच्या वाटा तुमच्या नजरेतून उलगडत गेलात...........आणि सोप्पं, साधं तत्त्वज्ञान तिथल्या रंगीबेरंगी बाटल्यांमध्ये बुचकळी मारुन रंगीत झालं की काय असंही वाटलं क्षणभर.

आमच्या जोशी काका-काकूंची आठवण झाली. ८० व्या वर्षानंतरही ’आधार’साठी काम करताना त्यांना केवढा आनंद होत असेल. ताठ मानेने उभा राहणारा वटवृक्ष आपल्या सावलीची पखरण इतरांवर कशी करता येईल याचं उदाहरण घालून देतो.
ही सगळी माझी ’आनंदाची झाडं’.

तुमच्यातला वेगळं काहीतरी करणारा माणूस पाहिला बरं वाटलं. तुमच्याकडचे आंबे ओरपतानाही भरभरुन आठवण येत होती; उचक्या लागल्या असतील तुम्हाला.

नुसतं पत्रंच नाही, पत्रासोबत किलोभर काजूकत्ली ही पाठवतेय. तुमच्या फॅक्टरीतल्या काजूंची सर येणार नाही पण इकडच्या ’रामदास’कडची छान लागते.

आणि आज खूप दिवसांनी लिहावंसंही वाटतंय,

कळावे लोभ असावा.

Wednesday, May 27, 2009

पाउस

संध्याकाळी खिडकीत गमतीदार नमुने पाहत असताना वेळेआधीच येण्यासाठी उतावीळ झालेल्या पावसासारखी आलीस तू अवने, नि आता तसंच कोसळू की नको अशा आविर्भावात ढगातल्या ढगातच धुमसत राहशील.

'Monsoon knocks the door before time.' कॉफीचा कप पेपरवर ठेउन भरभर डोळ्यापुढे सरकलेल्या हेडलाईन्स रिचवत होते आणि ही बातमी वाचून आपसूक ठेवणीतलं हसू बाहेर आलं. पहिलटकरणीसारखा उतावीळ होउन, सगळे अंदाज चुकवून दर्शन देण्याची त्याची हौस अजून पुरती भागलेली नाही.
तिथे केरळच्या मातीवर मुक्तपणे उधळण करील आणि इथे येउन मात्र कांगावेखोर वरमाईसारखा मुहूर्ताला अडून, ढगातल्या ढगात फुगून बसेल. अशावेळी त्याच्या ढगावर(गालावर) एक मिश्कील टिचकी ठेउन द्यावीशी वाटते......म्हणजे मग तुझ्यासारखा भरभर ढग फुटून कोसळतो आणि मोकळा होतो.

आता प्लीज, तुझ्या त्या गोड, मुळमुळीत कॉफीचा हट्ट धरु नकोस बाई.
ती या तशा रोमॅंटिक पावसात पिणं ठीक आहे....
पण आत्ता कशी अंमळ कडक,
एक चमचा जास्तच घातलेल्या स्ट्रॉंग कॉफीने
घसा शेकण्याचा मूड असताना,
तू त्या कॉफीची आठवण?........... आत्ता नक्कोच मुळी...

कॉफी प्यायल्यावर कशी, विचारांना एक दमदार किक बसते आणि सरसर लेखणीतली शाई कागदावर उतरते.
तशीच किक सिगरेट प्यायल्यावरही बसते म्हणे आणि त्याची तारवट नशा डोळ्याच्या कडांवर अमाप साचल्यासारखी..............................तुला आठवतं?

नुकतीच गाण्याची ऑडिशन देउन बाहेर आले होते आणि तुला म्हटलं.....तो होता तिथे हार्मोनियमची साथ द्यायला.
’सुरांकडेही लक्ष ठेवा बाईसाहेब.’
त्याचा फुकट सल्ला....पण आवडला होता. त्यात तथ्य होतं म्हणून.

’चेन स्मोकर आहे तो.’
नेसकॉफी मारत बसल्या बसल्या तू म्हणालीस आणि थोडे आश्चर्याने डोळे विस्फारले.
तसं एक-दोनदा पाहिलं होतं टपरीवर पण या असल्या गोष्टींबाबतीत माझं नेहमीच ’मागासलेलं ज्ञान’
आणि तुझी बारकाव्यांवर चाणाक्ष नजर नेहमीच.

’त्याचा इन्फ्लुअन्स जबरदस्त आहे’ अशा सुरुवातीच्या निरीक्षणापासून ते ’कसला माज आहे एवढा त्याला’ पर्य़त आपल्या कॉफीटॉक्समधून तो डोकावत राहिला ,तिच्या पिंगट डोळ्यातल्या कुतूहलापेक्षा किंचित जास्तच.......
एकंदर ’त्यांचा तो ग्रुप’ आणि
बराच काळ पसरलेल्या त्यांच्या त्या अफवा..............पाचही वर्षं चघळण्याइतपत पुरतील इतक्या.
तो कधीच कुणाला नीट कळला नाही. अनियमित पावसाप्रमाणे कोडी घालत, नंतर भिजवण्यापुरताही उरला नाही.
अचानक त्याने ’नटराज पेन्सिलस’ लिहिलेलं पुडकं वाढदिवसाला हातात सोपवलं आणि हा काय बावळटपणा म्हणून मी ते उघडूनही पाहिलं नव्हतं. दुस-या तिस-या दिवशी फोनवर बोलता बोलता उघडलं आणि क्षणभर अवाक झाले.............’छोटासा गणपती.’ मी नमनापुरते त्याचे आभार वगैरे मानले आणि गुपचूप शेल्फ मध्ये ठेउन दिला.


आज अगदी आठवण येईल तेव्हा तो माझ्या हातात असतो....
विलक्षण पडलेल्या कोडयासारखं न वाटता समाधान देउन जातो.
तेव्हा मला नकळत पावसाची आठवण होते,
टपरीवरुन ओघळणारे थेंब कॉफीत पडले की तिला मस्त चव येते............उगीचंच बरं वाटतं.