Tuesday, June 2, 2009

कळावे लोभ असावा.

काही क्षणांचं क्रेडिट कोणाच्या नावावर द्यावं असा प्रश्नच पडतो मला नेहमी तावडे साहेब. कसं कधी कोण इटुकला-पिटुकला आनंद पदरात टाकून जाईल सांगता येत नाही. त्यातून माणसात रमणा-या मला त्याचं कवतिक जास्तच! सुख-दु:खाचा धांडोळा करण्यापेक्षा माणसाच्या थेट डोक्यात जाउन चर्चा करणं आवडतं आपल्याला. मनाचं सोडा, त्याचं काय घेउन बसलात.......माणसं डोक्याकडून मनापर्यंत जाणारी असावीत तिथून बाहेर जाण्याचा मार्ग नसतो. पण हे चक्रव्यूह बाकी उत्तम!!!

तुमच्यातलं एक धमाल ’व्यक्तिमत्त्व’ भेटलं नसतं तर लोणावळ्यापर्यंतचा प्रवास सार्थकी लागला नसता. त्यामुळे आपल्या बोलघेवडया नक्षत्रांमध्ये तुमची वर्णी लागली नाही तरच नवल!

पण आभाराचे पहिले धनी ’सोशो-टेक्नॉलॉजी’ची यशस्वी सेवा पुरवणारे, खिशाला भोकं पाडणारे ’व्हॉल्वो सर्विसवाले.’ त्यांच्या बसने अंमळ पाउण तास उशिर केला नसता तर आपली भेट झालीच नसती.

आणि स्नॅकेटेरियामधलं एकमेव जोडपं सोडलं तर पूर्ण बस-स्टॅंडवर एकही गोष्ट ईंटरेस्टींग नव्हती.....

खरं तर बस-स्टॅंड, रेल्वे स्टेशन्स म्हणजे ’हॅपनिंग जागा’. सुखेनैव गोष्टी बघण्याची, एका प्रबंधाला पुरेल इतकं खाद्य पुरवणारी जागा. त्यात व्हॉल्वो ने जाणार सांगितल्यावर गौर उडालीच होती.....तिच्या मते या बशीत हॅंडसम, मोस्ट एलिजीबल बॅचलर्स असतात....टीसीएस, विप्रो अशी नोकरीतली सुखावणारी लेबलंही त्यांना असतात. ’मोस्ट एक्साइटिंग थिंग फॉर गर्ल्स यू नो’............
ह्या निता’झ च्या स्टॅंडवर एक चिडचिडं रिकामलेपण साचलं होतं. त्यात भर म्हणून उन्हाच्या झळा.

स्नॅकेटेरियामध्ये एक पिज्झा पोटात ढकलून वर पाणी प्यायले....अगदी पोटात जाईपर्यंत त्याचा गार प्रवाह अनुभवला. हात धुण्यासाठी केलेल्या इकॉनॉमिक आयडियेचं पोटभरुन कौतुक केलं आणि मग मात्र बाहेर आल्यावर भूमिगत शांततेचं काय करावं असा प्रश्न पडला. बहुधा लोणावळ्याच्या स्टॉल्सवर दिसणा-य चिक्क्यांनी, रंगीबेरंगी सरबतांनी माझं मनोरंजन केलंही.....पण छोटया कंटाळ्याचं रुपांतर गहन फिलॉसॉफीत करण्यात अस्मादिक माहिर..........त्यामुळे त्यातून बाहेर काढणा-या क्लृप्त्या महाग असतात.

बुक-स्टॉल्सवर बर्‍यापैकी वेळ गेला...त्यात Randy Pausch च्या ’The last lecture' ची कॉपी दिसली. ती घेण्याच्या विचारात असतानाच.....तुमची ओळख झाली. देवगढ हापूसच्या माध्यमातून. जिव्हाळ्याची माणसं तेवढयाच जिव्हाळ्याच्या माध्यमातून भेटावीत असं नशीबच आहे बहुतेक.
खरं तर तुम्हाला पाहिल्यावर मला एक गंमत पाहून हसू आलं...........तुमच्या खांद्यावरच्या ’टॅलेन्ट हाउसवर’; दहा-बारा भुरभरणारे केस कातडीला एवलासाही रंग लागू न देता इतक्या कुशल पद्धतीने काळे करणा-याचं कौतुक आणि मनोमन गंमत वाटली.

तुमच्या काजू-फॅक्टरीची गाडी सुटली ती अगदी सगळे उद्योग सांगून मगंच थांबली. या वयात...हा माणूस एवढे उद्योग करतो, ते ही घर एका टोकाला......लग्नं झालेल्या दोन्ही मुली दुसर्‍या टोकाला अजून एखादा असलाच उद्योग तिस‍र्या टोकाला. तुमच्या जगावेगळ्या उत्साहाची तर दाद देनी पडेगी. ज्या वयात लोकं वानप्रस्थाश्रमाच्या गोष्टी करतात, त्या वयात तुमची सेकंड इनिंग सुरु. तुम्ही गावच्या माणसांच्या वाटा तुमच्या नजरेतून उलगडत गेलात...........आणि सोप्पं, साधं तत्त्वज्ञान तिथल्या रंगीबेरंगी बाटल्यांमध्ये बुचकळी मारुन रंगीत झालं की काय असंही वाटलं क्षणभर.

आमच्या जोशी काका-काकूंची आठवण झाली. ८० व्या वर्षानंतरही ’आधार’साठी काम करताना त्यांना केवढा आनंद होत असेल. ताठ मानेने उभा राहणारा वटवृक्ष आपल्या सावलीची पखरण इतरांवर कशी करता येईल याचं उदाहरण घालून देतो.
ही सगळी माझी ’आनंदाची झाडं’.

तुमच्यातला वेगळं काहीतरी करणारा माणूस पाहिला बरं वाटलं. तुमच्याकडचे आंबे ओरपतानाही भरभरुन आठवण येत होती; उचक्या लागल्या असतील तुम्हाला.

नुसतं पत्रंच नाही, पत्रासोबत किलोभर काजूकत्ली ही पाठवतेय. तुमच्या फॅक्टरीतल्या काजूंची सर येणार नाही पण इकडच्या ’रामदास’कडची छान लागते.

आणि आज खूप दिवसांनी लिहावंसंही वाटतंय,

कळावे लोभ असावा.

3 comments:

Anonymous said...

nice...liked it!!

सर्किट said...

हे पत्र ही सही आहे! पण ह्या ब्लॉगवर फ़क्त २ च पोस्ट्स? लिहीण्यावरून तर तू नवखी ब्लॉगर वाटत नाहीस, म्हणजे तुझा मुख्य ब्लॉग दुसरीकडेच कुठे दिसतोये!

सखी said...

मन:पूर्वक धन्यवाद :)
हो,संख्या फारच रोडावलेली दिसत्ये हे खरंय, पण अजून तरी दुसरीकडे शाखा नाही. ;)
आणि ही पत्रं...जिवाभावाची त्यामुळे तशी जाणीव प्रसूत होताच ती लिहायला बसते.फक्त त्यात एवढं अंतर पडणार नाही याची काळजी आता घ्यावी असं म्हणते!!!