संध्याकाळी खिडकीत गमतीदार नमुने पाहत असताना वेळेआधीच येण्यासाठी उतावीळ झालेल्या पावसासारखी आलीस तू अवने, नि आता तसंच कोसळू की नको अशा आविर्भावात ढगातल्या ढगातच धुमसत राहशील.
'Monsoon knocks the door before time.' कॉफीचा कप पेपरवर ठेउन भरभर डोळ्यापुढे सरकलेल्या हेडलाईन्स रिचवत होते आणि ही बातमी वाचून आपसूक ठेवणीतलं हसू बाहेर आलं. पहिलटकरणीसारखा उतावीळ होउन, सगळे अंदाज चुकवून दर्शन देण्याची त्याची हौस अजून पुरती भागलेली नाही.
तिथे केरळच्या मातीवर मुक्तपणे उधळण करील आणि इथे येउन मात्र कांगावेखोर वरमाईसारखा मुहूर्ताला अडून, ढगातल्या ढगात फुगून बसेल. अशावेळी त्याच्या ढगावर(गालावर) एक मिश्कील टिचकी ठेउन द्यावीशी वाटते......म्हणजे मग तुझ्यासारखा भरभर ढग फुटून कोसळतो आणि मोकळा होतो.
आता प्लीज, तुझ्या त्या गोड, मुळमुळीत कॉफीचा हट्ट धरु नकोस बाई.
ती या तशा रोमॅंटिक पावसात पिणं ठीक आहे....
पण आत्ता कशी अंमळ कडक,
एक चमचा जास्तच घातलेल्या स्ट्रॉंग कॉफीने
घसा शेकण्याचा मूड असताना,
तू त्या कॉफीची आठवण?........... आत्ता नक्कोच मुळी...
कॉफी प्यायल्यावर कशी, विचारांना एक दमदार किक बसते आणि सरसर लेखणीतली शाई कागदावर उतरते.
तशीच किक सिगरेट प्यायल्यावरही बसते म्हणे आणि त्याची तारवट नशा डोळ्याच्या कडांवर अमाप साचल्यासारखी..............................तुला आठवतं?
नुकतीच गाण्याची ऑडिशन देउन बाहेर आले होते आणि तुला म्हटलं.....तो होता तिथे हार्मोनियमची साथ द्यायला.
’सुरांकडेही लक्ष ठेवा बाईसाहेब.’
त्याचा फुकट सल्ला....पण आवडला होता. त्यात तथ्य होतं म्हणून.
’चेन स्मोकर आहे तो.’
नेसकॉफी मारत बसल्या बसल्या तू म्हणालीस आणि थोडे आश्चर्याने डोळे विस्फारले.
तसं एक-दोनदा पाहिलं होतं टपरीवर पण या असल्या गोष्टींबाबतीत माझं नेहमीच ’मागासलेलं ज्ञान’
आणि तुझी बारकाव्यांवर चाणाक्ष नजर नेहमीच.
’त्याचा इन्फ्लुअन्स जबरदस्त आहे’ अशा सुरुवातीच्या निरीक्षणापासून ते ’कसला माज आहे एवढा त्याला’ पर्य़त आपल्या कॉफीटॉक्समधून तो डोकावत राहिला ,तिच्या पिंगट डोळ्यातल्या कुतूहलापेक्षा किंचित जास्तच.......
एकंदर ’त्यांचा तो ग्रुप’ आणि
बराच काळ पसरलेल्या त्यांच्या त्या अफवा..............पाचही वर्षं चघळण्याइतपत पुरतील इतक्या.
तो कधीच कुणाला नीट कळला नाही. अनियमित पावसाप्रमाणे कोडी घालत, नंतर भिजवण्यापुरताही उरला नाही.
अचानक त्याने ’नटराज पेन्सिलस’ लिहिलेलं पुडकं वाढदिवसाला हातात सोपवलं आणि हा काय बावळटपणा म्हणून मी ते उघडूनही पाहिलं नव्हतं. दुस-या तिस-या दिवशी फोनवर बोलता बोलता उघडलं आणि क्षणभर अवाक झाले.............’छोटासा गणपती.’ मी नमनापुरते त्याचे आभार वगैरे मानले आणि गुपचूप शेल्फ मध्ये ठेउन दिला.
आज अगदी आठवण येईल तेव्हा तो माझ्या हातात असतो....
विलक्षण पडलेल्या कोडयासारखं न वाटता समाधान देउन जातो.
तेव्हा मला नकळत पावसाची आठवण होते,
टपरीवरुन ओघळणारे थेंब कॉफीत पडले की तिला मस्त चव येते............उगीचंच बरं वाटतं.
6 comments:
hi
i visited first time on your blog .
This is really one of the great work , i came across. I really liked this post , i enjoyed and now waiting for the romantic monsoon ....
mala jaast marathi nahi yete , par mala samajhto ,as I am from Nagpur.
thanks . Please visit my poem blog to read new poems : www.poemsofvijay.blogspot.com
regards
vijay
Thanks for your heartily comment Sir! :)
I would love to read your Hindi blog,
will reply soon!!
छान लिहीलंयेस! :)
bhijalyasarkhe watle
आवडलं, पण अपुरं अपुरं वाटलं. खूप काही भारंभार लिहावं, सगळे तपशील द्यावेत, असं नाहीच. पण इथे काहीतरी कमी आहे अशी चुटपुट लागतेय...
पण सगळा ब्लॉग वाचायलाच लागणार!
मेघना,सर्प्रथम या मोकळ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
मला स्वत:लाही पोस्टल्यानंतर ही हुरहुर लागून राहिलीच..कुठेतरी अपुर वाटतंय अशी.थोडा मनातलं कागदावर उतरवतानाचा धांदरटपणा नडतो बर्याचदा.
Post a Comment