Tuesday, February 19, 2013

लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारे लेखकही हल्ली लेखनाची उर्मी आपल्यात जागवू शकत नाहीत अशा स्व-समजुतीत आणि अनाहूत कोशात मी होते नाना,
मात्र तुझ्या एका स.वि.वि. ने पुनश्च लिहितं व्हावंसं वाटतंय आज… एवढाला पत्रप्रपंच मांडूनही पत्र म्हणजे नेमकं काय हे सांगताना इतक्या समपर्क शब्दात मी कधीही व्यक्त होउ शकले नसते.
तुझ्या पहिला नमनाचा लेख अनुदिनीवरील मित्रांकरिता…
(नाना पाटेकर लिखित लोकसत्ता मधील लेख )
*******
माधवास,
आज उगाचच कारण नसताना पत्र लिहावंसं वाटंलं. 
फोनवर बोलता येतं, पण मोकळं होता येत नाही. 
पत्रातून भळभळता येतं, पुन:पुन्हा वाचता येतं पत्र. 
काहीतरी वेगळं गवसतं, वाचता वाचता. 
पत्र लिहिणाऱ्याचा चेहरा समोर यायला लागतो -
पूर्वी सिनेमात दाखवायचे तसा. 
फोन वन-डायमेंशनल आहे, पत्र थ्री-डायमेन्श्नल वाटतं. 
फोन उपचार वाटतो, पत्र दखल वाटते. 
आई आणि दाई इतका फरक आहे दोघांत. 
पत्र धन आहे, फोन संशोधन आहे. 
फोन सोय आहे, पत्र साय आहे. 
पत्राला नातं आहे, पत्र व्योम आहे. 

क्षितिजावरचा इवलासा पक्षी आहे पत्र. 
कागदावर कोरलेली वेरूळची नक्षी आहे पत्र,
नात्याला घातलेली साद आहे पत्र,
उगाचच घातलेला वाद आहे पत्र,
पत्र फुंकर आहे, पत्र झुळूक आहे. 
आभाळाला भिडणारी वावटळ आहे पत्र,
कडेकपारीत झुळझुळणारा झरा आहे पत्र. 
सीतेला पडलेला मोह आहे,
कालियाचा डोह आहे,
अश्वथाम्याची भळभळणारी जखम आहे,
आठवणीच्या झाडावरुन अवखळ वाऱ्यानं खुडलेलं पान आहे पत्र. 
पत्र छंद आहे, नाद आहे, अंतरीचा निनाद आहे. 
ज्ञानाची ओवी, तुक्याचा अभंग, दासाचा श्लोक,
येशूच्या खांदयावरचा सूळ,
बैलाच्या घंटेची किणकिण,
खारकुंडीचा डोंबारखेळ,
पारंब्यांना लोंबकळणारा उनाड पोर,
संथ पाण्यात तरंग उठवणारा खडा,
आईचा मुका, बाबांचा धपाटा,
केळीच्या सालीवरून घसरणारी फजिती,
सक्काळी गावाजवळून जाणाऱ्या झुकझुक गाडीची घोगरी शीळ,
गुरवानं तळहातावर ठेवलेला बत्तासा,
मनगटावर नात्याला कसून बांधणारा राखीचा दोरा,
एकमेकांच्या खांदयावर  हात टाकून शाळेकडे जाणारी पायवाट,
अलिबाबाची गुहा आहे रे पत्र,
बाबांच्या पाठंगुळीला बसलेलं अढळपद आहे पत्र,
बहीण सासरी निघाल्यावर रिते रिते झालेले डोळे आहेत पत्र,
अंगणात आईनं घातलेल्या रांगोळीचं, डोळ्यांत पडलेलं प्रतिबिंब आहे पत्र,
अनंताला पडलेला प्रश्न आहे पत्र. 
किनाऱ्याच्या ओढीनं काठावर आलेली लाट आहे पत्र,
श्रावणाच्या खांद्यावरची कावड आहे पत्र,
होय-नाहीचं द्वंद्वं आहे पत्र,
स्वत:ला शोधण्याचा खेळ आहे पत्र,
टाचा उंचावून फळीवरचा खाऊ चोरण्याचा धिटुकला प्रयत्न आहे पत्र,
पाटीवर लिहिलेलं थुंकीनं पुसणं,
भवतालानं लादलेली घुसमट,
निर्लज्जपणाची कबुली,
नपुंसकत्वाची जाणीव,
गांधारीनं नाकारलेलं सूर्याचं अस्तित्व,
एकलव्याचं प्राक्तन,
विष्णूच्या बेंबीतून डवरलेल्या कमळात बसण्याची इच्छा,
गर्द वनराईला घुसळून टाकणारा वारा,
ठुसठुसणारं नखुरडं,
विवेकाला वटवाघळासारखं उलटं लटकलेलं नाकर्तेपण,
डोंगरावर उभं राहून आकाश झिमटण्याचा प्रयत्न,
रजस्वला द्रौपदीचा दीनवाणा चेहरा,
क्षितिजावर संध्या करणारा दिनकर,
सुतळीचा फेटा बांधून सरसर फिरणारा भोवरा,
पोटात नक्षी मिरवणारा बैदुल,
तांबड्या मातीवरची बैलाच्या मुताची वेलांटी,
काय काय आहे रे पत्र !
अल्याड पल्याड कुठलीच सीमा नाहॆ. 
कुठं कुठं फिरून येता येतं. 
पत्र माझा सखा आहे. 
पत्र अजान आहे, चर्चमधली प्रार्थना आहे,
पत्र म्हणजे बुद्धाच्या डोळ्यातली करुणा आहे. 
पत्राच्या आजूबाजू आहेत 
पत्राच्या चारी बाजूंनी फिरता यायला हवं. 
एवढ्याशा कागदात ब्रह्मांड दडलेलं असतं, नाही रे?
निवांत कृष्णाच्या अंगठ्यात रुतणारा बाण आहे पत्र. 
आपल्या संस्कारांचं गोत्र आहे पत्र. 
भल्याथोरल्या नात्याची आपल्या पायाखाली आलेली सावली आहे पत्र-
जसजशी सायंकाळ होईल तशी ती मोठी होईल. 
आपल्या नात्याला दृष्ट लागू नये म्हणून मी 
हल्ली सावलीला तीट लावतो. 
पत्राला कारण नाही. 

तुझा-
नाना 

७-२-१३ 

ताजा कलम:
काल मला एक प्रश्न विचारला -
अफजल गुरूला फाशी दिल्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
आनंद झाला का? एक बाइट हवाय. 
मी म्हणालो, 'त्याने जे केले ते घृणास्पदच होते, त्याची शिक्षा त्याला मिळाली आणि मिळायलाच हवी होती. 
आनंद मात्र झाला नाही.'
आसपासचे आवाज क्षीण ऐकू येताहेत. 
पूर्ण धूरकट नाही, पण स्पष्टसुद्धा दिसत नाही काही. 
सुन्नपणा आलाय. 
प्रश्न पडलाय -
माझ्या देशातल्या मुलांच्या मनात- मग ते कुठल्याही धर्म, पंथाचे असोत - असे देशद्रोही विचार का येताहेत 
?
राजकीयदृष्ट्या आमचं काही चुकतंय का?
काही धोरणात्मक बदल आवश्यक आहेत का?
असतील तर आम्ही  का थांबलो आहोत?
तरुणाईची मानसिकता अशी का होतेय, या प्रश्नाच्या मुळाला आम्ही का भिडत  नाही?
उदया याच मार्गानं माझा मुलगा गेला तर?
त्याचाही अंत असाच झाल्यावर पुन्हा एक बाइट टीव्हीवर 
'तुमच्या मुलाला फाशी झाली, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल ?'
एका बापाला वाटलं तेच वाटणार. 
पुन्हा तोच प्रश्न - आम्ही कुठं कमी पडतोय ?
फाशी देऊन प्रश्न संपणार आहेत का?
वय झालेला बाप म्हणून प्रश्न छळताहेत रे. 
चुकतंय का रे माझं ?
लिहिताना हात थरथरत नसेल तर उत्तर धाड. 
तुझीही तब्येत बरी नसे हल्ली. 

तुझा -
नाना  



      
   

Wednesday, August 26, 2009

मंथन

अझिझ,

लेका बर्‍याच काळानंतर एक पुस्तक मस्तपैकी मागे लागलंय., म्हणजे भावनिक पसारा तसा आटोपशीरच पण बुद्धीतत्त्वावर लढणा-या आपल्यासारख्यांची हौस भागवणारं.

तुला आठवत असेल तर असं एखादं पुस्तकंच नव्हे तर वाक्य, शब्द किंवा अगदी कोणता-कोणताही आनंद उकळत्या उत्साहानिशी सांगण्यासाठी ’दाजीsssssssss’ म्हणून ओरडत पाठीला पाय लावून पळायचो आपण.

आपण साले आर्किमिडीज असतो तर दाजी, दाजी म्हणूनच ओरडत आलो असतो ना रे? किंबहुना मला वाटतंय की आर्किमिडीजचा आजा दाजींसारखा असता ना तर त्यालाही युरेका ची भानगड सुचलीच नसती.

पुस्तकं वाचणारे बहुत आहेत दोस्ता, पण दाजींसारखा पुस्तक खुलवून सांगणारा कुणी नाही. दाजी म्हणजे चालतं बोलतं पुस्तक होते, जगातल्या कोणत्याही पुस्तकाचा सारांश स्वत:च्या शब्दात खुलवणारे.

'I miss him badly.'

शांता गोखलेंच्या ’त्या वर्षी’ बद्दल म्हणत होते मी. शेवटची ओळ वाचून संपल्यावर हे पुस्तक आवडण्याचं एक कारण....लेखिकेने तटस्थपणे समोर मांडलेली पात्रं.

गडया, रंगमंच उभा करणं सोप्पंय पण त्यातल्या पात्रांना हवा तसा तो वापरु देणं हे कठीण! आपली कलाकृती मांडताना त्यात फक्त संकल्पना ओतत नाही मी, माझ्या संवेदनाही नकळत उमटत जातात.

अखंड शिल्प तयार झाल्यावर कुठे कुठे कोरीव जागी उरतो आपण मागे...स्पर्शातून कधी नेणिवांतूनही.

इथे मात्र एक संपूर्ण कॅनव्हास कुंचल्याचा, हव्या तशा रेघोटया मारण्याचं स्वातंत्र्य....आकाश आणि अवकाश प्रत्येकात खोल खोल बुडी मारण्याचं अवधान.

असं स्वातंत्र्य मला देता येईल का? माझीच सावली पूर्णपणे शरीरावेगळी करुन पाहंयाचे प्रयत्न चूक की बरोबर? लेखिकेने ते केलंय हे वाटणंही माझ्याच बुद्धीनुसार....पण ’ दाजींचं पुस्तक सांगतं, ’आपला आपल्याशीच झगडा असावा, तो संपेपर्यंत काहीतरी वेगळं गवसलेलं असतं...त्यालाच मंथन म्हणतात गुंडया.’

पुस्तकात काही संदर्भानुसार येणा-या छोटया गोष्टी....तिथे काहीवेळ थांबून आपलं निरांजन आपणच घासून पुसून लख्ख करावंसं वाटलं मला.

त्यातलीच एका’काशुओ इशिगुरो’ नावाच्या जपानी लेखकाची गोष्ट,

’त्यातला ओनो हा चित्रकार. तो आणि इतर शिष्य़ गुरुकुलात राहतात. सर्वच जण गुरुंच्या विचारांवर श्रद्धा ठेवून चित्र काढत असतात पण ओनो मात्र अस्वस्थ मनातून. गुरुंचं चित्रविश्व अति-रोमॅंटिक.

सुंदर गेशा, साके पिउन रंगलेल्या रात्री, पण ओनोला आजूबाजूचं वास्तव अस्वस्थ करत असतं. त्याची नवी चित्र पाहून गुरु नाराज होतात; पण हसण्यावारी नेतात. ही तरुणपणाची खुमखुमी आहे म्हणतात.’ही रग जिरेल आपोआप तोपर्यंत रंगव असली चित्रं.’

ओनो म्हणतो हा माझा विचार आहे, चित्रकाराने सदैव सौंदर्यात रममाण होणं मला योग्य वाटत नाही. आपला काळ कठीण आहे. कलाकारांनी आपल्या कामात भोवतालच्या परिस्थितीला महत्त्व दिलं पाहिजे. गुरुंचा भडका उडतो. ते त्याला ’चालता हो’ सांगतात. ज्या दालनात त्यांचं हे संभाषण चालू असतं ते हळूहळू अंधारायला लागतं. ओनो शांतपणे एकेक कंदील पेटवू लागतो. हे त्याचं गुरुकुलात रोजचंच काम असतं, तेवढं करतो आणि निघून जातो.’

आपल्या प्रत्येकात एक ओनो लपलेला नसतो? फळ्यावरचं चित्र बघून पावसातली बाई काढताना? सगळे सिद्धांत मान डोलवून वहीत छापताना? ’हे बरोबर नाही, कारण हे असंच आहे पूर्वीपासून’ अशी निरगाठ अधिकाधिक पक्की करताना.?

मनातले गोंगाट बाहेर न दाखवता हाच ओनो शांतपणे आपल्याच पेशींना कधी परका होतो याचा विचार करतो आपण? सृजनशीलतेला नियम असतात?

एका ’पेंटींग कॉम्पिटिशन मध्ये’ काढलेलं चित्र पाहता पाहता परीक्षक गंभीर होतात., सगळया चित्रांचे कागद चार वेळा तपासून बघताना त्यांना तेच काळ्या रेघोट्या मारुन विद्रूप केलेलं चित्र परत परत अस्वस्थ करतं. त्याहूनही अस्वस्थ करतं ते वास्तव...बारा वर्षाच्या मुलाच्या हातून असं काहीतरी का उमटावं?.......त्या मुलाला बोलवून ते प्रेमाने त्याची चौकशी करतात.

चित्रातली प्रतिमा त्याची आई....पण दुसरी. तिच्या वास्तवातल्या वागण्या-बोलण्यातून त्याच्या मनातल्या आईच्या प्रतिमांवर असेच ओरखडे उमटत जातात. ऐकून परीक्षकांकडे सांत्वनापुरते शब्दच उरत नाहीत.

मुलाच्या चित्राला पहिलं बक्षिस मिळतं. मुलगा मात्र मान खाली घालून उभा असतो कोरडा....रखरखीत. चित्रातल्या काळ्या रंगासारखा ठळक.

आपण सौंदर्यच पाहिलं मग ते रेखाटू नये असं नाही रे पण कुणाच्या चित्रातल्या दाहक प्रतिमा फोल ठरवणारे आपण कोण?

*************

पुस्तकात रेंगाळावंसं वाटणारी ही दुसरी जागा....काही मान्यवर चित्रकारांपैकी एकाच्या भाषणातून येते.
सत्य आहे, आजच्या बर्‍याच कलाकारांची कैफियत आहे.

’ऐंशीच्या दशकात आमच्यासारखे चित्रकार जे कलाविश्वात उतरले त्यांच्या आणि आजच्या परिस्थितीत काही साम्यस्थळे आहेत. आमच्या चित्रांना तेव्हा जशी मागणी नव्हतीच तशीच आजच्या इन्स्टॉलेशन्स, व्हिडीओ कलाप्रकारांना नाही.

’प्रोग्रेसिव्ह ग्रूप’ ने करुन करुन दिलेल्या वाटांचा आम्हाला किती फायदा झाला याचं वर्णन करुन सांगणं कठीण आहे. मी बंगालमधला. तिथं एका बाजूला अबनींद्रनाथ टागोर आणि दुसर्‍या बाजूला जामिनी राय्हे तथाकथित अस्सअल भारतीय कलेचे प्रतिनिधी. त्यांच्य कामात आम्ही आम्हाला सापडत नव्हतो. तो काळ नवतेचा. भाकरा नांगल धरण उठत होतं. ’ल कॉर्ब्युझीए’ चंदीगढ बांधत होता. बिमल रॉयने ’दो बिघा जमीन’ हा समाजाची काळी बाजू दाखवणारा चित्रपट तयार केला होता. त्याही आधी उदयशंकरनं ’कल्पना’ चित्रपटाची निर्मिती करुन नृत्यकलेला उच्चअस्थान प्राप्त करुन दिलं होतं.

आम्ही कोणीही परंपरा नाकारली नाही. तिला तात्पुरती दृष्टीआड केली. काही निर्माण करायचं झालं की काहीतरी तोडावं लागतं. हे सर्व सृजनात्मक कार्याचं तत्त्व आहे. अशा काळात कलाकार स्वत:ला पूर्णपणे ताणत असतो. दृष्टिक्षेपातलं शेवटचं टोक गाठत असतो. ते गाठल्यानंतरच ह्या देशात वाढलेल्या, रुजलेल्या आणि अंत पावलेल्या चित्रपरंपरा आणि वर्तमानातले प्रवाह यात कुठे तरी तो आपला सर्जनशील बिंदू शोधण्यात सक्षम होतो....

त्या वेळच्या समाज अभिरुचीला केवळ वास्तववाद मान्य होता. मध्यमवर्गीयांना जी चित्र पटकन कळली, भावली अश साध्या सोप्या गोष्टी सांगणा-या देखावे रंगवणा-या चित्रांनी ही अभिरुची घडवली होती. तिची कास सोडायला हा वर्ग तयात नव्हता. त्यामुळे आमच्या प्रयत्नाला तिरस्काराखेरीज या समाजाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

आज एका दिवंगत कलाकाराचं चित्र १५ लाख रुपये किमतीला विकलं गेल्याची बातमी आपण अभिमानाने सांगतो, तेव्हा हे ध्यानात ठेवलं पाहिजे की त्याचं १लं चित्र विकलं गेलं ते ३२व्या वर्षी २०० रुं. ना., ते ही पाश्चिमात्त्य संग्राहकाला. तो आप्ला माणूस होता, आपल्या मातीत जन्मलेला. म्हणून आज आपण गर्व करतो पं त्याच्या हयातीत त्याच्या कलेला आपण परकी कला ठरवलं होतं हे विसरुन चालणार नाही......’

आपण जिवंत असताना संस्कृती गतप्राण होतेय म्हणून बोंबलू कसे शकतो आपण?

मोठाच्या मोठा उतार झालाय आपापलीच तत्त्वं झापडं लावून फरफटत नेण्याच्या प्रयोगात....पायथ्याशी संस्कृतीचे रक्षणकर्ते.....टोकावरच्या लोकांशी त्यांचा संपर्कच तुटलेला. मधले पूल गायब. अशी टिकेल संस्कृती की संस्कार?

असले प्रश्न विचारुन भंडावून सोडलं तरी पक्क्या विचारांच्या बैठकीनिशी माझं मलाच उत्तर शोधायला लावणारे दाजी....त्यांना कुठे रुढीप्रिय राहण्याची सवय होती? पण रुढीप्रिय नाही म्हणून आपल्या पाळामुळांविषयी आपल्याला ठाउक असणंच महत्त्वाचं नाही या मताचे मात्र नक्कीच नव्हते.

आपला विश्वास आहे की नाही हा अध्याय पुढचा पण उद्या भांडायचं झालंच तर ज्ञान मात्र हवं अगदी पुढच्या मागच्या दोन्ही खंडांचं. पाया डळमळीत बांधून मजले रचण्याचं तंत्रज्ञान फुकाचं, त्यात कसब नाही. मग पत्त्त्यांसारखे कोसळले की लढवणार आपण नवशिके मावळे.

पुस्तकांचं एक आवडतं...नवनव्या पटांवर अशी चेकमेट करण्याची, होण्याची मजा असते. आपापल्या ताकदीनिशी आपण तानाजी लढवायचा.... फक्त इथे सरशीपेक्षा, लढत महत्त्वाची.

************
दाजींच्या एका नाटयप्रयोगातलं माझं एक ज्याम फेवरेट वाक्य आठवतंय आत्ता. त्याचे तपशील तूच शोध.

श्रीमंत, लेकीची खेळण्याची हौस संपलीये.....
आपणच उभारलेल्या रंगमंचावर थोडं कसदार होउन वावरु दे तिला....सम्राज्ञीपण पेलवताही यायला हवं..जोपर्यंत त्याची मिरवणूक निघत नाही तोपर्यंत पडदा टाकण्याची गरज नाही.